संस्कारापासुन समाज दूर चालला आहे – ॲड.अपर्णाताई रामतिर्थकर

अंबाजोगाईत चार जिल्ह्यांचा ज्येष्ठ नागरिक महिला विभागीय मेळावा

अंबाजोगाई : प्रत्येक कुटुंबात छोट्या-छोट्या गोष्टींमुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर करून अनेक जण न्यायालयात धाव घेत आहेत. समाजात अशी प्रवृत्ती वाढत आहे, कुटुंबात दिवसें-दिवस कलह वाढून एका मुलाकडे आई तर दुसर्‍याकडे वडील अशी आई-वडीलांची विभागणी होत असुन माणसांची मने संकुचित होत चालली आहेत. आपल्या मुलांचा सांभाळ करून टाईम टेबल पाळणार्‍या सुनेकडे सासु-सासर्‍यांसाठी मात्र वेळ नाही. त्यामुळे समाजात वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संस्कारापासुन समाज दुर चालला आहे. त्यामुळे ऊठ सुट न्यायालयात जाणार्‍या कुटुंबांनी एकमेकांना समजून घ्यावे.आपणात चर्चा करावी, संयुक्त कुटुंब व्यवस्था ही काळाची गरज आहे. जे समाधान गरीबत असते. ते श्रीमंतीत नाही. श्रीमंती म्हणजे चंगळवाद, भौतिकवाद या भौतिकवादातून कुटुंबात कलह वाढत आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड.अपर्णाताई रामतिर्थकर यांनी केले.

अंबाजोगाईत रविवार दि. 20 ऑक्टोबर रोजी अनिकेत मंगल कार्यालयात चार जिल्ह्यांचा ज्येष्ठ नागरिक महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड.अपर्णाताई रामतिर्थकर तर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी फेस्कॉन महिला आघाडीच्या राज्यध्यक्षा डॉ.मायाताई कुलकर्णी, फेस्कॉनचे उपाध्यक्ष आण्णासाहेब टेकाळे, दक्षिण मराठवाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ.बी.आर.पाटील, उपाध्यक्ष डॉ.दामोधर थोरात, सचिव प्रभाकर कापसे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार, कार्याध्यक्ष अ‍ॅड.अनंतराव जगतकर, ज्येष्ठ नागरिक महिला संघाच्या अध्यक्षा कमलताई बरूळे यांची उपस्थिती होती.

प्रारंभी लातूर येथील ज्येष्ठ नागरिक महिला संघाने साने गुरूजी यांची ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ही प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक कमलताई बरूळे यांनी केले. तर यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना आण्णासाहेब टेकाळे, डॉ.बी.आर.पाटील यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप डॉ.मायाताई कुलकर्णी यांनी केला. यावेळी लातूर जिल्ह्यातील औसा तांड्यावरील ज्येष्ठ नागरिक महिला-भगिनींनी पारंपारिक लमाण वेशभुषा परिधान करून मेळाव्यात सहभाग घेतला. मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी येथील 700 हून अधिक ज्येष्ठ नागरिक महिला व पुरूष मेळाव्यास उपस्थित होते. या प्रसंगी नव्याने स्थापन झालेल्या ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यात भावठाणा (जि.बीड),औसा, उस्मानाबाद व परभणी येथील नूतन संघाचा समावेश होता. दुसर्‍या सत्रात सासु-सुनांचा संवाद व कौटुंबिक गितांसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विजयाताई इंगोले यांनी केले. अंबाजोगाईच्या योगेश्‍वरी महिला ज्येष्ठ नागरिक संघाने स्वागतगीत सादर केले. उपस्थित महिलांचे आभार इंदुताई पोटपल्लेवार यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी सर्व ज्येष्ठ नागरिक महिला संघ सदस्या, ज्येष्ठ नागरिक संघ अंबाजोगाईचे अध्यक्ष पुंडलिक पवार, सचिव प्रा.मनोहर कदम, कार्याध्यक्ष अ‍ॅड.अनंतराव जगतकर, कोषाध्यक्ष धनराज मोरे, स्वागताध्यक्ष डॉ.डी.एच. थोरात, विभागीय महिला मेळाव्याच्या आयोजक भुसा मॅडम यांच्या सह सर्व ज्येष्ठ नागरिक महिलांनी पुढाकार घेतला.