भाजपाचा पराभव अटळ आहे – विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातच युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसीची आवश्यकता असून या ठिकाणी एमआयडीसी झाल्यास युवकांना बाहेरगावी रोजगारासाठी स्थलांतर करावे लागणार नाही. विधानसभा निवडणूकीत परळी मतदार संघात राष्ट्रवादी काँगेस व मित्रपक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे व केज मतदार संघात पृथ्वीराज साठे यांना विजयी केल्यास या ठिकाणी एमआयडीसी स्थापण करण्याची खबरदारी घेतली जाईल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. त्यासोबतच अंबाजोगाईला शैक्षणिक शहराबरोबर औद्योगिक नगरीही बनवू असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.
परळी मतदार संघातील राष्ट्रवादी काँगेस व मित्रपक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे व केज मतदार संघातील पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन शहरातील शंकर महाराज वंजारी वसतीगृह मैदान येथे आज दि. 18 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. या सभेसाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजीमंत्री पंडीतराव दौंड, माजी आ.पृथ्वीराज साठे, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग सोनवणे, नगराध्यक्षा रचना मोदी, नगराध्यक्ष आदित्य पाटील, डॉ.नरेंद्र काळे, बाबुराव मुंडे, विलासराव सोनवणे, दत्तात्रय पाटील, प्रा.मिलींद अवाड, कॉ.बब्रुवाहन पोटभरे, कुलदिप करपे, सुनिल जगताप, तुळशीराम पवार, भाई मोहन गुंड,गोविंद देशमुख, राजेश्वर चव्हाण, संजय दौंड, यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस हे आमच्यासमोर निवडणूकीच्या आखाडयात खेळायला पैलवानच नाही असे म्हणतात. मात्र आमच्याशी कुस्ती खेळण्याची ताकद भाजपात नाही असा टोला शरद पवार यांनी लगावला. पुर्वी जत्रेच्या निमीत्ताने गावागावात कुस्ती स्पर्धा व्हायची, कुस्तीला मोठे-मोठे पैलवान यायचे, सुरूवात मात्र लहान मुलांच्या कुस्तीने व्हायची. ती कुस्ती खायच्या ‘रेवडी’ वर व्हायची. मुख्यमंत्री देखील रेवडीवर कुस्ती खेळणारे पैलवान असुन त्यांच्यात आमच्याशी कुस्ती खेळण्याची कुवत नाही असाही टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. मुख्यमंत्री सभेत सांगत आहेत की, निवडणूकीत रस नाही. यावर बोलताना पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना निवडणूकीत रस वाटत नसेल तर, मोदी , शहा यांना कशाला निवडणूकीच्या जत्रेत फिरवत आहेत अशी जोरदार टीका केली.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, निवडणूकीला सामोरे जाता येईना म्हणुन भाजपा सरकार सत्तेचा गैरवापर करून विरोधकांवर खोटे गुन्हे नोंदवत आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न गेल्या पाच वर्षात सोडवता आले नसल्याने 370 कलम या बाबत दिशाभुल करून या सरकारने महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे. शेतकर्यांना कर्जमाफी नाही परंतु उद्योगपतींना हजारो कोटी रूपये माफ केले जातात. हा वेगवेगळा न्याय कशासाठी असा सवाल करून सरसकट कर्जमाफी करा आणि बळीराजाला आत्महत्येपासुन वाचवा. गेल्या पाच वर्षात काय केले ते आधी सांगा, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काय झाले असा सवालही पवार यांनी केला. महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास असणारे महाराजांचे गडकिल्ले सांभाळता येत नाहीत. त्यामुळे हे सरकार इतिहास पुसून टाकु पाहते. ते कदापीही महाराष्ट्र सहन करणार नाही. असेही पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि शंकरराव चव्हाण यांच्यासारखे प्रभावी मुख्यमंत्री लाभले. या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व समाज घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. परंतु भाजपा सरकारने मात्र जनतेला खोटी आश्वासने दिली. देशातील सामान्य माणूसही अमित शहाला ओळखत नाही. भाजपा सरकारच्या काळात 16 हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे पवार म्हणाले.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळी मतदार संघात देशाच्या पंतप्रधानांना सभा घ्यावी लागते यावरूनच भाजपाचा पराभव अटळ असल्याचे सांगुन भाजपाने जिल्ह्यातील जनतेला भावनिक करून डोळ्यात पाणी आणून निवडणूका जिंकल्या. परंतु जिल्ह्याचा विकास मात्र केला नाही. त्यामुळे या निवडणूकीत आपण राष्ट्रवादीला आशिर्वाद द्यावेत. आम्ही सर्वसामान्यांचे सर्व प्रश्न सोडवू असे सांगुन पृथ्वीराज साठे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले.
प्रारंभी प्रास्ताविक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी केले. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी, माजी मंत्री पंडीतराव दौंड, कॉ.बब्रुवाहन पोटभरे, बाबुराव मुंडे, दत्तात्रय पाटील, अॅड.अनंतराव जगतकर, ज्ञानोबा कांबळे, बन्सी जोगदंड, वसंतराव उदार, दत्ता घुगे, रवि देशमुख, हाफिस सिद्धीकी, कुलदीप करपे, भाई मोहन गुंड, नंदकुमार मोराळे यांची समायोचित भाषणे झाली. सभेचे सुत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांनी करून उपस्थितांचे आभार नगरसेवक बबनराव लोमटे यांनी मानले. यावेळी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व मित्रपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. अंबाजोगाई येथे आयोजित केलेली सभा विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली. सभेचे अतिशय नेटके नियोजन राजकिशोर मोदी यांनी केले होते. प्रचंड संख्येने लोक सभास्थळी उपस्थित होते.