टीम AM : साऊथचा सुपरस्टार ‘थलैवा’ रजनीकांत सध्या त्याच्या मोस्ट अवेटेड ‘जेलर’ चित्रपटासाठी सर्वत्र चर्चत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आणि सोशल मीडियावर एकच धुमाकूळ झाला.
या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा 72 वर्षीय रजनीकांत ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट 250 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे.
या चित्रपटात रजनीकांतसोबत तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट आज दि. 10 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल झाला, रजनीकांत यांनी जवळपास 2 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. सध्या सगळीकडेच याच चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे. प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर तुफान गर्दी केली आहे.
दरम्यान, हा चित्रपट पाहण्यासाठी चेन्नईमध्ये आलेल्या एका जपानी जोडप्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. हे जोडपं जपानमधील ओसाका या शहरामधून चेन्नईमध्ये खास ‘जेलर’ हा चित्रपट पाहण्यासाठी आलेलं आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘जेलर चित्रपट पाहण्यासाठी आम्ही जपानहून खास चेन्नईला आलो आहोत..’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यासुदा हिदेतोशी आणि त्याच्या पत्नीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अभिनेते रजनीकांत यांचे चाहते फक्त भारतातच नसून परदेशात देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं यातून दिसून येत.