टीम AM : आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवणारे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते दादा कोंडके यांचा आज जन्मदिन. कृष्णा खंडेराव कोंडके असे नाव असलेल्या या अवलिया कलाकाराने रुपेरी पडद्यावर दादागिरी केली. त्यांचे सलग सात चित्रपट हे ‘सिल्वर ज्युबिली’ ठरले.
बॅंड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्ये, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले. दादा कोंडके हे सेवा दलात सक्रीय होते. त्यांनी सेवा दलात सांस्कृतिक आघाडीवर कार्यरत राहिले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व कोसा-कोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले.
‘विच्छा माझी पुरी करा’ या वसंत सबनीस – लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. 1969 साली भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ‘सोंगाड्या’ (1971), ‘आंधळा मारतो डोळा’ (1973), ‘पांडू हवालदार’ (1975), ‘राम राम गंगाराम’ (1977), ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ (1978) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होते.
द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. पण काही चित्रपटातील आशयही दुर्लक्ष करण्यासारखा नव्हता. दादांनी आपल्या चित्रपटातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. काही वेळेस तत्कालीन परिस्थितीवर भाष्य केले.
दादा कोंडके यांचे चित्रपट हे खऱ्या अर्थाने ‘मास’ चे (समूहाचे) होते. व्हाईट कॉलर्ड (पांढरपेशा) वर्गाला त्यांच्या कमरेखालच्या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले. पण सामान्य प्रेक्षकांने त्यांना उचलून धरले. चित्रपटातील संवादामुळे अनेकदा त्यांचे सेन्सॉर बोर्डाशी खटके उडाले. दादा कोंडके यांनी मराठीच नव्हे तर हिंदी आणि गुजरातीमध्येही चित्रपट निर्मिती केली. दादा कोंडके यांच्या जन्मदिनानिमित्त विनम अभिवादन.