जिल्हा निर्मीतीसाठी अंबाजोगाईकर रस्त्यावर : दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलन, वाहतूक ठप्प

17 सप्टेंबरपर्यंत अंबाजोगाई जिल्हा घोषित न केल्यास तीव्र आंदोलन : अंबाजोगाई जिल्हा कृती समितीचा आंदोलनात इशारा

टीम AM : बीड जिल्ह्याचे विभाजन करुन स्वतंत्र अंबाजोगाई जिल्हा जाहीर करावा, या मागणीसाठी आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी अंबाजोगाईकर रस्त्यावर उतरले. शहरातील यशवंतराव चव्हाण चौकात तब्बल दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलन जिल्हा कृती समितीच्या वतीने करण्यात आले. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अंबाजोगाई जिल्हा आमच्या हक्काचा – नाही कोणाच्या बापाचा, आमचा जिल्हा – अंबाजोगाई जिल्हा या घोषणांनी यशवंतराव चव्हाण चौक परिसर दणाणून गेला होता. येत्या 17 सप्टेंबरपर्यंत बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा घोषित न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा अंबाजोगाई जिल्हा कृती समितीने ‘रास्ता रोको’ आंदोलनात दिला आहे.

अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती करावी, ही मागणी गेल्या 35 वर्षांपासून अंबाजोगाईकर सातत्याने करत आहेत. यासाठी अनेक तीव्र आंदोलने झाली. जिल्हा निर्मितीसाठी अंबाजोगाईकरांचे शिष्टमंडळ बहुतांश मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यांनी जिल्हा जाहीर करण्याचे आश्वासन दिले, मात्र ते हवेतच विरघळले. स्व. विमल मुंदडा यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हा निर्मितीसाठी लागणारे सर्वच शासकीय कार्यालयाची उभारणी केली, ते कार्यरत आहेत. नवीन अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करण्यासाठी शासकीय तिजोरीवर कुठलाही आर्थिक ताण पडणार नाही. 6 जानेवारी 2009 ला विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी बीड जिल्हा विभाजनाचा अहवाल पाठवला होता. 

विभागीय आयुक्त दिलीप बंड समितीने दिलेल्या निकषानुसार अंबाजोगाई जिल्हा जाहीर करावा, ही मागणी अंबाजोगाई जिल्हा कृती समिती करित आहे. याच मागणीसाठी आज यशवंतराव चव्हाण चौक येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अंबाजोगाई जिल्हा कृती समिती सदस्य, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, मेडिकल असोसिएशन, वकील संघ, पत्रकार संघ, कार्यकर्ते, अंबाजोगाईकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.