मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
टीम AM : राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. अशात आता आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
यापुढे राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. मंत्रिमंडळाने एकमताने याबाबत मोठा निर्णय घेतलाय.
राज्यातील गरीब, गरजू, रुग्णांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 21 नुसार Right to Health चा नागरिकांना अधिकार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय Super Speciality Hospital – नाशिक आणि अमरावती, कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहेत.
सध्या या सर्व रुग्णालयात वर्षभरात उपचार घेण्यासाठी सुमारे 2.55 कोटी नागरिक येतात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण 2418 संस्था आहेत, या सर्व ठिकाणी निःशुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत. गरीब आणि गरजू व्यक्तींना आपल्या आजारांवर उपचारासाठी पैसे नसतात. अशात काही कुटुंबातील तरुण तसेच लहान मुलांना देखील आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे अशा गरजुंसाठी मंत्रिमंडळाने एकमताने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे.