दिवाळीत उलगडणार अंकुश – शिवानी – पल्लवी यांच्या मिसकॉलवाल्या मैत्रीचे रहस्य
मुंबई : ‘गोष्ट वायरलेस प्रेमाची’ अशी टॅगलाईन असल्याने फर्स्ट लुक पासून चर्चेत असलेल्या ‘ट्रिपल सीट’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच दिमाखदार सोहळ्यात, हटके अंदाजात लाँच करण्यात आला. यावेळी चित्रपटाचे निर्माते नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया, सहनिर्माता स्वप्नील मुनोत, सहाय्यक निर्माता पुष्कर श्रीपाद तांबोळी, कथा, पटकथा व संवादलेखक आणि क्रीएटिव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित दळवी, दिग्दर्शक संकेत पावसे, कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासह ‘ट्रिपल सीट’ची संपूर्ण टीम उपस्थित होती.
अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एन्टरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित ‘ट्रिपल सीट’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कृष्णा म्हणजेच अंकुश चौधरी आपल्या तीन मित्रांसह कुणाच्या तरी घरात डोकावताना दिसत आहे. तसेच त्याच्या मोबाईलवर शिवानी सुर्वे अर्थात मीराचा मिसकॉल येतो. ती नेमकी कोण आहे हे त्याला माहीत नाही, मात्र त्यांच्यात मिसकॉलवाली मैत्री होते. दरम्यान, ट्रेलरमध्ये पल्लवी पाटील म्हणजेच वृंदाची एन्ट्री होते. कृष्णा आणि वृंदा एकमेकांना कधीच सोडून न जाण्याचे वचन देताना दिसतात. शिवाय, प्रविण विठ्ठल तरडे इन्स्पेक्टर दिवाने च्या भूमिकेत आहेत. त्यांची व्यक्तीरेखा कृष्णाच्या आयुष्यातील गुंता सोडवतात की वाढवतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ट्रेलरच्या शेवटी अंकुश एका मुलीच्या हातात अंगठी घालताना दिसतो, हा हात नेमका कुणाचा आहे? हे जाणून घेण्यासाठी यंदाच्या दिवाळीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
एका सत्य घटनेवर आधारित ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटात अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील यांच्यासह प्रविण विठ्ठल तरडे, शिल्पा ठाकरे, राकेश बेदी, विद्याधर जोशी, वैभव मांगले, योगेश शिरसाट, स्वप्नील मुनोत, प्रकाश धोत्रे, अभिजीत झुंजारराव, प्रसाद बेडेकर, पूनम पाटील, शोभा दांडगे, राहुल नेवाळे यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला अविनाश – विश्वजित यांचे संगीत लाभले असून गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांची गीते आहेत.
हरमन कौर आणि रोहित राऊत यांच्या आवाजातील ‘नाते हे कोणते’ बेला शेंडे यांच्या ‘रोज वाटे’ या दोन्ही गीतांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर स्वप्नील बांदोडकरच्या आवाजातील एक गाणे लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘एका मिसकॉलने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील तर जगातल्या सर्वांनी आपल्या जवळच्या मित्राला मिसकॉल मारावा’ असे सांगणारा ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.