जिल्हा निर्मितीसाठी अंबाजोगाईकर एकवटले : उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

टीम AM : बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा स्वतंत्र जाहीर करावा. या मागणीचे निवेदन कृती समितीच्या वतीने आज दिनांक 18 जुलै मंगळवार रोजी सकाळी उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना देण्यात आले. यावेळी कृती समितीच्या सदस्यांनी अंबाजोगाई जिल्ह्याच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्माण करावा, ही येथील नागरिकांची मागणी आहे. या मागणीसाठी अंबाजोगाईकर गेल्या 35 वर्षांपासून विविध माध्यमातून लढा देत आहेत. तरीही अद्याप या मागणीचा गांभीर्याने विचार शासन दरबारी झाला नाही. या मागणीसाठी शहरातील सर्वपक्षीय युवक व नागरिकांनी कृती समिती जाहीर करून मागणीसाठी लढा उभारला आहे. मंगळवारी सर्वांनी एकत्रित येऊन या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी शरद झाडके व आ. नमिता मुंदडा यांना दिले.

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्यासाठी असणारी सर्व पुरक कार्यालये इथे अस्तित्वात आहेत, तरीही जिल्हा झाला नाही. आजपर्यंत सातत्याने जिल्हा निर्मितीचे आंदोलने विविध माध्यमातून सुरूच आहेत. आतापर्यंत बहुतांश मुख्यमंत्र्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. आगामी काळात या संदर्भात ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी अंबाजोगाई जिल्हा कृती समितीचे सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.