टीम AM : बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा बनलेली अभिनेत्री जरीना वहाब हिचा आज (17 जुलै) वाढदिवस आहे. आजही अभिनेत्री आपल्या दमदार अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या हृदयांवर राज्य करते. झारिना वहाबने मोठ्या आणि छोट्या पडद्यावर सासू – सुनेपासून आईपर्यंतच्या सगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
जरीना वहाब, अभिनेता आदित्य पांचोलीची पत्नी आणि अभिनेता सूरज पांचोलीची आई आहे. जरीना वहाबची गणना 70 – 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये केली जाते. मात्र, तिच्यासाठी हा प्रवास फारसा सोपा नव्हता. अनेकदा नकार पचवून देखील तिने हिंमत सोडली नाही. सावळ्या रंगामुळे अनेकांनी तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला होता.
जरीना वहाबचा जन्म 17 जुलै 1959 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झाला. केवळ हिंदीच नव्हे, तर जरीना वहाबने इंग्रजी, उर्दू आणि तेलुगूसह अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जरीना वहाबने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथून चित्रपटाचे आणि अभिनयाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे. मात्र, या अभ्यासानंतरही इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला होता. जरीना वहाब बॉलिवूडमध्ये खूप संघर्ष करत होती. मात्र, केवळ सावळ्या रंगामुळे तिला सतत नकार ऐकून घ्यावा लागत होता.
अखेर तिच्या संघर्षाला यश मिळाले. ‘इश्क इश्क इश्क’ या चित्रपटात नवा चेहरा म्हणून जरीना वहाबची निवड झाली. ‘इश्क इश्क इश्क’ हा चित्रपट अभिनेता देव आनंद बनवत होते. ते या नवीन चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याचे कळल्यावर जरीनाने लगेचच ऑडिशन दिली होती. या चित्रपटात झीनत अमानच्या बहिणीची भूमिका जरीना वहाबला मिळाली होती. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकला नाही. मात्र, या चित्रपटाने जरीना वहाबला लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटानंतर जरीनाचा चेहरा प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘इश्क इश्क इश्क’ नंतर जरीनाकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या.
राजश्री प्रॉडक्शनच्या ‘चित्तचोर’ या चित्रपटातून जरीना वहाबला तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर ती ‘घरौंदा’, ‘अनपढ़’, ‘सावन को आने दो’, ‘नैया’, ‘सितारा’ आणि ‘तड़प’ यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली होती.