खळबळजनक : स्वा.रा.ती. रुग्णालयातून बाळ चोरीला ; सीसीटीव्ही बंद

अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील वार्ड क्रमांक 8 मधील प्रसुती कक्षातून बाळ चोरीला गेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी घडली असल्याने स्वा. रा. ती. प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. तर दुसरीकडे वार्ड क्रमांक 6 मध्ये नवजात बाळाला (मुलीला)कोणीतरी ठेवून पळ काढला आहे. सदरील मुलगी कोणाची आहे, हे अदयाप समजले नाही.दरम्यान सदरील घटना घडल्यानंतर रुग्णालयात नातेवाईकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. या दोन्ही घटनेचा अधिक तपास पोलिस यंत्रणा करीत आहे.

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील समस्या काही संपत नसतानाच आज बाळ चोरीच्या घटनेने प्रशासन हादरले आहे. स्वा.रा. ती. रुग्णालयात धारूर येथील शेख सफीना शेख सैफ ( वय 28 वर्ष ) या महिलेची प्रसुती बुधवारी झाली होती. तिने मुलाला जन्म दिला होता. आज वार्ड क्रमांक 8 मधील शेख सफीना या महिलेचे नातेवाईक दुपारी 11 ते 12 च्या दरम्यान जेवायला बाहेर आले होते. शेख सफीनाने बाळाला झोपवून स्व:तही झोपी गेली होती. याच दरम्यान तिचे बाळ चोरीला गेले. झोपीतून उठल्यानंतर तिला जवळ बाळ नसल्याचे दिसल्यानंतर ती आरडाओरड करत बाहेर नातेवाईकांकडे पळत आली. रुग्णालयात सर्वत्र शोध घेतल्यानंतरही बाळ सापडले नाही.अशी माहिती सदरिल महिलेच्या नातेवाईकांनी दिली आहे. स्वा. रा. ती. रूग्णालयातील ही घटना वाऱ्यासाखी पसरल्यानंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी एकच गर्दी केली. सदरिल घटनेची माहिती मिळताच पोलिस रूग्णालयात दाखल झाले असुन सदरिल घटनेचा अधिक तपास करित आहेत.

रूग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी केवळ 14 कॅमेरे चालू आहेत. आज वार्ड क्रमांक 8 मध्ये सकाळी साडेदहा वाजेपर्यंत कॅमेरा चालू होता. त्यानंतर कॅमेरा बंद झाला आहे,असे नातेवाईकांचे म्हणने आहे. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढतच असल्याने जनतेतून स्वा.रा. ती. प्रशासनाविरूध्द तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान बाळ चोरीला गेल्याच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी प्रा. रमीज सर यांनी केली आहे.