राज्यात 26 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा : हवामान विभागाचा अंदाज

टीम AM : राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा हजेरी लावली आहे. आज सकाळपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. पुढच्या काही तासांमध्ये मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, पालघर या जिल्हयांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत. कोकणसह पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांत आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट 

पुढील 24 तासात कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली या भागांमध्ये आजही पावसाचा जोर कमी पाहायला मिळेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट 

रायगड, रत्नागिरी इथे सोमवार, मंगळवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या मुंबई, ठाण्यात मध्यम सरींचा अंदाज आहे तर रविवारीही मुंबईमध्ये पावसाचा जोर खूप नसेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. ठाण्यात रविवारी तुरळक ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता असेल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, दरवर्षीपेक्षा या वर्षी राज्यात पाऊस उशीराने दाखल झाला आहे. राज्यातील अनेक भागात अजूनही पेरणी झालेली नाही. शेतकरी चांगल्या दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.