खोलेश्वर महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांची सैन्य, अग्निशामक, पोलीस दलात निवड

टीम AM : भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागातील एकूण दहा विद्यार्थ्यांची (कॅडेट्स) भारतीय सैन्य दल, अग्निशामक दल व पोलीस दल विभागात  निवड झाली असून ते पुढील प्रशिक्षणासाठी देखील रवाना झालेले आहेत. या यशामुळे खोलेश्वर महाविद्यालयाच्या शिरपेचात या विद्यार्थ्यांच्या रूपाने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी यांनी व्यक्त केले. 

या दहा विद्यार्थ्यांचा नुकताच महाविद्यालयाच्या वतीने सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार देखील करण्यात आला. यात कॅडेट सुमित ज्याच्चक, कॅडेट बिभीषण गडदे, कॅडेट धर्मराज नरुटे या तिघांची भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून तर कॅडेट पवन खंडागळे, कॅडेट महादेव घाडगे, कॅडेट निखिल जोगदंड, कॅडेट रवींद्र जाधव व कॅडेट लखन कौले या पाच जणांची मुंबई अग्निशामक दलात निवड झाली असून ते पुढील प्रशिक्षणासाठी मुंबई येथे रवाना झालेले आहेत. 

तसेच कॅडेट संयोगिता गोचडे हिची पालघर पोलीस विभागात तर कॅडेट निकिता गोचडे हिची मुंबई पोलीस दलात निवड झालेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांची एन.सी.सी. विभाग प्रमुख प्रा. कॅप्टन सुंदर खडके यांनी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी करून घेतली व भरतीसंदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केले. यापूर्वीही त्यांच्या एन.सी.सी. विभागामधून शंभर पेक्षाही जास्त कॅडेट्सना विविध विभागात नोकरीची संधी प्राप्त झालेली आहे.

या यशाबद्दल सर्व कॅडेट्सचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, प्रशासकीय अधिकारी प्रा. चंद्रकांत मुळे, केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. कल्पना चौसाळकर, वर्षा  मुंडे, आप्पाराव यादव, बाबुराव आडे, अविनाश तळणीकर, स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष विजयराव वालवडकर, स्थानिक कार्यवाह किरण कोदरकर तसेच इतर सर्व केंद्रीय व स्थानिक पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.