टीम AM : महाविद्यालयीन प्रवेश काही कारणास्तव रद्द झाल्यास अनेक विद्यार्थी पालकांना प्रवेश शुल्क परत मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. परंतु ‘युजीसी’ ने सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना (HEIS) प्रवेश रद्द होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे संपूर्ण शुल्क 30 सप्टेंबरपर्यंत परत करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती ‘युजीसी’ अध्यक्ष ममिदलाल जगदेश कुमार यांनी दिली आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.
बहुतांश शिक्षण संस्थांकडून महाविद्यालयीन प्रवेश रद्द झाल्यास प्रवेश शुल्क परत दिले जात नव्हते. याबाबतीत आयोगाने म्हटले आहे की, प्रवेश रद्द केल्यानंतर किंवा मागे घेतल्यावर उच्च शैक्षणिक संस्थांद्वारे शुल्क परत न केल्याबद्दलचे अनेक निवेदने, तक्रारी त्यांना विद्यार्थ्यांकडून तसेच पालकांकडून प्राप्त झाल्या होत्या.
दरम्यान, 27 जून रोजी झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा केली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, तसे शैक्षणिक संस्थांना निर्देश (Refund of Fees) देण्यात आले आहेत. हा नियम 2023 – 24 या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येत असल्याचे देखील ‘युजीसी’ कडून स्पष्ट करण्यात आले आहे.