टीम AM : ‘ओये शावा, शावा…’ सारखी गाणी जेव्हा सुरू होतात, तेव्हा अक्षरशः असे वाटू लागते की, अमिताभ बच्चन स्वतःच्या आवाजात ही गाणी गात आहेत. अनेकदा तुम्ही देखील फसला असाल. मात्र, हा आवाज अमिताभ बच्चन यांचा नसून, गायक सुदेश भोसले यांचा हा आवाज आहे.
सुदेश भोसले यांनी जेव्हा जुम्मा – चुम्मा हे गाणे गायले, तेव्हा खुद्द जया बच्चन देखील यावर विश्वास ठेवायला तयार होत नव्हत्या. पुढे सुदेश भोसले अमिताभ बच्चन यांचा आवाजच बनले.
आपल्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगताना सुदेश भोसले सांगतात, त्यांना लहानपणापासूनच सगळ्या गायकांच्या आवाजाची नक्कल करण्याची सवय होती. त्यांनी एकदा अमिताभ बच्चन यांचा ‘मुकद्दर का सिकंदर’ हा चित्रपट पाहिला होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा ते शाळेत गेले, तेव्हा त्यांनी सगळ्यांना हा आवाज काढून फसवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सगळ्यांनीच त्यांचे कौतुक केले. पुढे त्यांनी ‘मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्रा’ मध्ये व्यावसायिक गाणी गायला सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांचा आवाज बनण्यासाठी त्यांनी खूप तयारी केली आहे.
संगीतकार अरुण – अनिल यांनी त्यांना पहिली मोठी संधी दिली. पहिल्यांदा त्यांनी मराठी चित्रपटासाठी गाणे गायले. त्याकाळात सुदेश भोसले किशोर कुमार यांच्यासोबत कॉन्सर्ट करत असत. त्यावेळी बप्पी लाहिरी यांनी सुदेश यांच्याकडून एक गाणे गाऊन घेतले. ‘अजूबा’ या चित्रपटात जेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ‘या अली’ हे गाणे गायले होते, जेव्हा खुद्द अमिताभ यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला होता. यानंतर त्यांना अमिताभ बच्चन यांच्यासाठी गाण्याची संधी मिळू लागली.
त्यानंतर एक गाणे अमिताभ बच्चन स्वतः गाणार होते. पण, ते ऐनवेळी सुदेश भोसले यांच्याकडून रेकॉर्ड करून घेण्यात आले. जेव्हा त्यांनी गाणे गायले, तेव्हा अनेक लोकांना आश्चर्य वाटले. हे गाणे अमिताभ बच्चन नव्हे, तर दुसऱ्याने गायले आहे, यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता.
सुदेश भोसले आणि अमिताभचा आवाज इतका जुळत होता की, लोकांना वाटले हे गाणे स्वतः अमिताभ यांनी गायले आहे. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वतः जया बच्चन यांना वाटले की, हे गाणे अमिताभ यांनीच गायले आहे. अशाप्रकारे पुढे सुदेश भोसले अमिताभ बच्चन यांचा आवाज बनले.