क्रुझर – ट्रकचा भीषण अपघात : 6 जण ठार, मृतात लहान मुलांचा समावेश

टीम AM : सोलापुरच्या अक्कलकोटात देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाला. दुपारी चार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने अक्कलकोट येथे खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या गुलबर्गा येथील आळंद तालुक्यातील काही भाविक क्रुझर  गाडीने अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शनाला आली होती. मात्र, दर्शन घेऊन घरी जात असताना अक्कलकोट तालुक्यातील शीरवळवाडी वळणावर त्यांचे वाहन समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकला धडकले. हा अपघात इतका भीषण होता की, यात सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर, जखमींवर अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. हा अपघात नेमकं कशामुळे घडला, याचा पोलीस तपास करीत आहेत. स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शनाला आलेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.