आरडी बर्मन यांचा जन्मदिन : असे जुळले होते आरडींचे अन् आशा भोसलेंचे सूर ! लव्हस्टोरी माहितीये ?

टीम AM : प्रसिद्ध संगीतकार आरडी बर्मन यांचा आज जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 27 जून 1939 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचा विवाह आशा भोसले यांच्याशी झाला होता. या दोघांची लव्हस्टोरी खूप फिल्मी आहे. आरडी बर्मन आणि आशा भोसले यांची पहिली भेट 1956 मध्ये झाली होती. पहिल्या भेटीत दोघांमध्ये फारसा संवाद देखील झाला नव्हता. केवळ त्यांची तोंड ओळख झाली होती. या भेटीच्या तब्बल 10 वर्षांनंतर दोघांचा एकत्र काम करण्याचा योग आला.

1966 मध्ये आरडी बर्मन यांनी ‘तीसरी मंझिल’ या चित्रपटाच्या गाण्यासाठी आशा भोसले यांच्याशी संपर्क साधला. ‘ओ हसीना जुल्फों वाली..’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान दोघांमध्ये छान मैत्री झाली.

‘तीसरी मंझिल’ चित्रपटानंतर आशा भोसले यांनी आरडी बर्मन यांच्यासाठी गाणे सुरू केले. आरडींनी संगीत दिलेल्या चित्रपटात आशा भोसले यांचा आवाज नक्कीच असायचा. दोघांनी 70 च्या दशकापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. याच काळात आरडी बर्मन आणि आशा भोसले या दोघांचे लग्न मोडले होते.

आरडी बर्मन त्यांची पत्नी रिता पटेल यांच्यापासून विभक्त झाले होते. तर, आशा यांनी पती गणपतराव भोंसले यांचे घर सोडले होते. दोघेही आयुष्याच्या प्रवासात एकटे पडले होते. एकत्र काम करताना त्यांना एकमेकांची साथ मिळू लागली.

अखेर आरडी बर्मन यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यांनी आशा भोसले यांना प्रपोज करताना म्हटले की, ‘तू अशी एकमेव व्यक्ती आहेस, जिला गाणे समजते. मी तुझ्या आवाजाच्या प्रेमात पडलो आहे.’ आशा भोसले यांना देखील त्यांच्या भावना समजल्या आणि त्यांनी होकार दिला. पण, त्यांच्या नात्यात अनेक अडथळे आले. आरडी बर्मन यांची आई दोघांच्या नात्याला विरोध करत होती. त्यामुळे दोघांनीही वेळेच्या भरोशावर आपलं प्रेम सोडलं होतं.

दरम्यान, आरडी बर्मन यांचे वडील सचिन देव बर्मन यांचे निधन झाले आणि आई मीरा मनोरुग्ण झाल्या. त्यांची स्मरणशक्ती गेली. त्यांनी मुलालाच ओळखणे बंद केले. आईची ढासळती तब्येत पाहून आरडी बर्मन यांनी 1980 मध्ये आशा भोसले यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा संसार केवळ 14 वर्षांचा होता. 1994 मध्ये वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी आरडी बर्मन यांचे निधन झाले. आरडी बर्मन यांना अभिवादन.