मिथुन चक्रवर्तींना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर : फुटपाथवर काढलेत दिवस, वाचा…

टीम AM : चित्रपट क्षेत्रातला प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना जाहीर झाला आहे. येत्या 8 ऑक्टोबरला 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात मिथून चक्रवर्ती यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. त्यानिमित्त मिथुन चक्रवर्ती यांचा जीवनप्रवास जाणून घेऊयात. मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 16 जून रोजी झाला असून ते 74 वर्षांचे आहेत. 1976 मध्ये ‘मृगया’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

गंमत म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. पण इंडस्ट्रीत पदार्पणापूर्वी त्यांच्या मनात आत्महत्येसारखे विचार येत होते, त्यांना सतत वाटायचे की ते काही करू शकणार नाहीत.

2011 मध्ये एका मुलाखतीत, मिथुन यांनी त्यांच्या चित्रपट जगतातील 35 वर्षांच्या प्रवासाबद्दल सांगितले. तसेच त्यांच्या संघर्षाचीही आठवण काढली. ते म्हणाले, ‘मी माझ्या संघर्षाच्या दिवसांबद्दल बोलणार नाही कारण त्यामुळे अनेकांचे मनोधैर्य खचले जाईल. प्रत्येकजण संघर्ष करतो, परंतु माझा संघर्ष खूप मोठा होता.

मी खरोखर फुटपाथवरुन आलो आहे

मिथुन पुढे म्हणाले, ‘हा संघर्ष असा होता की, समजा मी फूटपाथवरून आलोय, आणि खरंच फूटपाथवरून आलोय. मुंबईत मी बरेच दिवस घालवले आहेत, तेव्हा मी कधी फाइव्ह गार्डन्समध्ये झोपायचो तर कधी कुणाच्या हॉस्टेलसमोर. माझ्या एका मित्राने मला माटुंगा जिमखान्याचे सदस्यत्व मिळवून दिले होते. जेणेकरून मी बाथरूम वापरू शकेन. मी सकाळी तिथे जायचो, फ्रेश होऊन, दात घासून मग माझ्या वाटेला लागायचो. तिथून निघून गेल्यावर कुठे जायचे, पुढचे जेवण कधी मिळेल आणि कुठे झोपायचे हे मला माहीत नव्हते.

मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले

मिथुन पुढे म्हणाले, ‘जे लोक संघर्ष करत आहेत त्यांची जिद्द मला तोडायची नाही. एक वेळ अशी आली की, मला काहीच करता येणार नाही असं वाटायला लागलं, शेवटचा पर्याय म्हणून माझ्यासमोर आत्महत्या तर येणार नाही ना असे मला वाटू लागले होते. याची अनेक कारणे होती.

मी खेळातही हार मानली नाही

माझ्या राजकीय पार्श्वभूमीमुळे मी कोलकात्याला परत जाऊ शकलो नाही आणि मी काहीही करू शकलो नाही. कृपया तुमच्या जीवनातील परिस्थितीशी लढल्याशिवाय ते संपवण्याचा विचार कधीही करू नका. मला हरवायचे कसे हे माहित नव्हते आणि मी खेळात कधीही हार मानली नाही. मिथुन चक्रवर्तींना पुढील कार्यासाठी शुभेच्छा.