भीषण अपघात : ट्रकला मागून दुचाकीची जोराची धडक, 3 तरुणांचा जागीच मृत्यु

टीम AM : मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. एका दुचाकीवरून जात असताना महामार्गावर उभा असणाऱ्या ट्रकला मागून जोराची धडक बसली. यात तिन्ही तरुण जागीच गतप्राण झाले. पालघर मधील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातिवली येथे हा अपघात घडला. मृत तरुण एकाच बाईकवरून जात होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर रात्रीच्या उभा असलेल्या कंटेनरला या भरधाव बाईकने धडक दिली. या अपघातात विक्रमगड तालुक्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हे तिन्ही मयत वसईतील एका कारखान्यातील कामगार असल्याची माहिती समोर आली आहे. कारखान्यातून सुट्टी झाल्यावर घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातात नरेश लाडक्या भोईर (22 रा. करसोड), सूरज राघ्या ठाकरे (18 रा. डोल्हारी बुद्रुक), मयूर विनोद ठाकरे (रा.17 डोल्हारी बुद्रुक) या तिघांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. बाईकवरून प्रवास करताना तिघांनीही  हेल्मेटचा वापर केला नव्हता. तसंच ट्रिपल सीट असताना बाईक भरधाव चालवल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. तर अवजड वाहनचालक हे रात्रीच्या वेळेस महामार्गावर अवजड वाहन पार्क करत असल्याने अशा अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.