अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी सोडलं राहत घर, जाणून घ्या अभिनेते कुलदीप पवार यांचा जीवनप्रवास

टीम AM : मराठी मनोरंजन विश्वात असे अनेक दिग्गज अभिनेते होऊन गेले, ज्यांनी केवळ नायक म्हणूनच प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर खलनायकही तितक्याच ताकदीने साकारला. अशाच अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे अभिनेते कुलदीप पवार. त्यांचा आज जन्मदिन आहे. आज जरी कुलदीप पवार आपल्यात नसले, तरी त्यांच्या दमदार भूमिकांमधून ते नेहमीच प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनात अजरामर ठरले आहेत. भारदस्त आवाज व आकर्षक व्यक्तीमत्व लाभलेल्या कुलदीप पवार यांनी नेहमीच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं.

कुलदीप पवार यांना लहानपणापासून अभिनयाचं वेड लागलं होतं. रूपेरी पडदा त्यांना नेहमीच खुणावत होता. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी आपलं कोल्हापूर येथील राहत घरही सोडलं होतं. कोल्हापूर, कराड, पुणे असा प्रवास करता करता अखेर ते मायानगरी मुंबईत येऊन धडकले. दरम्यानच्या काळात त्यांनी ‘एक माती अनेक नाती’ हा चित्रपट केला होता. मात्र, हा चित्रपट गाजल्यानंतर देखील त्यांच्याकडे नव्या ऑफर येत नव्हत्या. त्यांना कुठेच काम मिळत नव्हतं.

कामाच्या शोधात असतानाच एका मध्यस्थामार्फत त्यांची भेट नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकरांशी झाली. या भेटीने त्यांच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळवून दिली. जेव्हा कुलदीप पवार यांची भेट झाली तेव्हा, प्रभाकर पणशीकर त्यांच्या ‘इथे ओशाळला मृत्यू’ तील ‘संभाजी महाराजां’ च्या भूमिकेसाठी कलाकाराच्या शोधात होते. योगायोगाने त्यांची कुलदीप पवारांशी भेट झाली आणि त्यांना हवा तसा कलाकार मिळाला. कुलदीप पवार यांचा भारदस्त आवाज अन् धिप्पाड शरीरयष्टी यामुळे ते या भूमिकेत चपखल बसले. त्यानंतर मग त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही.

‘इथे ओशाळला मृत्यू’ नंतर त्यांना एकामागोमाग एक चांगली नाटकं मिळत गेली. ‘अश्रूंची झाली फुले’, ‘होनाजी बाळा’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘पती माझा उचापती’ ही त्यांची नाटके तुफान गाजली. यानंतर रूपेरी पडद्यावरही त्यांनी जोरदार एन्ट्री घेतली. चित्रपटातही त्यांनी आपला लक्षणीय ठसा उमटवला. साधा भोळा नायक ते बेरकी खलनायक अशा विविधरंगी भूमिका त्यांनी अतिशय ताकदीने साकारल्या होत्या. ‘तुळजाभवानी’, ‘कलावंतीण’ सारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्यानंतर अनंत मानेंच्या ‘दरोडेखोर’ चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

‘दरोडेखोर’ या चित्रपटाने कुलदीप पवार यांच्या कारकिर्दीला नवे वळण दिले. ‘अरे संसार संसार’ या चित्रपटामधील रांगडा शेतकरी त्यांनी जसा साकारला, तितक्याच ताकदीने त्यांनी ‘शापित’ चित्रपटातील खलनायकही गाजवला. ‘जावयाची जात’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘नवरे सगळे गाढव’, ‘गुपचूप गुपचूप’, ‘खरा वारसदार’ हे त्यांचे मराठी चित्रपट तुफान गाजले. छोट्या पडद्यावरची त्यांची ‘डिटेक्टीव्ह परमवीर’ ही मालिका देखील खूप गाजली होती. कुलदीप पवार यांना अभिवादन.