टीम AM : आगामी लोकसभा आणि अनेक राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे लोकसभा आणि महाराष्ट्रातील निवडणुका एकत्र होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भाजप आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी याबाबतचे संकेत दिले आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामांशिवाय अन्य कामे देऊ नका, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी निवडणुकीचे काम वेळापत्रकानुसार होणे आवश्यक असल्याने उपजिल्हा निवडणूक अधिकारी व त्यांच्या अंतर्गत असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांकडे निवडणुकीव्यतिरिक्त कोणतेही काम दिले जाऊ नये, असे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच होणार असल्याची चर्चा आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांना आदेश जारी केला आहे. त्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाशिवाय अन्य जबाबदारी न देण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी अधिकाऱ्यांनी मतदारसंघातील स्थितीचे अहवाल तयार करण्याची तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्र आणि हरियाना विधानसभेची मुदत ऑक्टोबर 2024 मध्ये संपणार आहे. तसेच लोकसभेची निवडणूक एप्रिल 2024 मध्ये होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र तसेच हरियानातील विधानसभा विसर्जित करून दोन्ही राज्यांच्या निवडणुका लोकसभेबरोबर होण्याची शक्यता आहे.