चोरट्यांचे पोलिसांना आव्हान
टीम AM : अंबाजोगाई शहरात असलेल्या बसस्थानकात चोरीचे सत्र सुरूच आहे. 52 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीनंतर आता बस स्थानकातून एकाचा मोबाईल चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. 23) दुपारी घडली आहे.
दरम्यान, बसस्थानकात होत असलेल्या चोरीच्या घटना पाहता एकप्रकारे चोरटे पोलिसांना आव्हान देत आहेत. वाढत्या चोरीच्या घटना बघता बसस्थानकातील प्रवाश्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
पांडुरंग गडम (रा. योगेश्वरी नगरी, अंबाजोगाई) हे बसस्थानकात आले होते. यावेळी त्यांच्या खिशातील सॅमसंग कंपनीचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोराने चोरुन नेला. याप्रकरणी अज्ञात चोराविरुद्ध गडम यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात कलम 379 भादवी नुसार गुन्हा दाखल झाला आहे. मागील काही दिवसांपासून अंबाजोगाई बसस्थानकात चोरीच्या घटना वाढत असल्याने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर प्रवाश्यांच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.