आता चोरीला गेलेला मोबाईल शोधणं सहज शक्य होणार  

केंद्र सरकारने नवीन यंत्रणा सुरू करण्याचा घेतला निर्णय  

टीम AM : एखाद्या गर्दीच्या ठिकाणी अधिक काळ राहिल्यास आपल्याजवळील अनेक गोष्टी चोरीला जाण्याची शक्यता असते. बऱ्याचदा मोबाईल चोरी मोठ्या प्रमाणात होते. या मोबाईल चोरीला आळा घालण्यासाठी आता केंद्र सरकारने नवीन यंत्रणा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, या नवीन यंत्रणेमुळे काही मिनिटातच मोबाईल चोर पकडल्या जाईल. अथवा हरवलेला मोबाईल लागलीच सापडेल. ही यंत्रणा सरकार 17 मे पासून कार्यान्वीत करत आहे. त्यामुळे मोबाईलधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकार 17 मेपासून एक निगराणी प्रणाली सुरु करत आहे. या प्रणालीमुळे देशभरातील मोबाईलधारक त्यांच्या चोरीचा मोबाईल, हरवलेला मोबाईल ब्लॉक करु शकणार आहेत. एवढेच नाही तर हा मोबाईल कुठे आहे, याचाही पत्ता लागणार आहे.

टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बॉडी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स काही दूरसंचार मंडळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर केंद्रीय उपकरणे बसविण्यात येणार आहे. या प्रणालीला ‘सीईआयआर’ असे नाव आहे. दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि ईशान्य क्षेत्रात हा प्रयोग होईल.

दूरसंचार विभागाच्या एका अधिकाऱ्याने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, ही प्रणाली संपूर्ण देशात लवकरच सुरु करण्यात येऊ शकते. सीआयआयआर प्रणाली 17 मे पासून देशभरातील काही ठिकाणी सुरु होत आहे. सीडॅकचे मुख्य कार्यपालक अधिकारी आणि चेअरमन राजकुमार उपाध्याय यांनी निश्चित तारखेविषयी अधिकृत माहिती दिली नाही. त्यांनी सांगितले की, प्रणाली तयार आहे.

येत्या तिमाहीत संपूर्ण देशात ही प्रणाली सादर करण्यात येईल. त्यामुळे ग्राहक, मोबाईल वापरकर्ते मोबाईल फोन ब्लॉक अथवा ट्रॅक करु शकतात. सीडॅकने मोबाईल फोन शोधण्यासाठी पूर्वीच्याच प्रणालीत काही बदल केले असून त्यात काही खास फिचर्स जोडले आहेत.

केंद्र सरकारने भारतात मोबाईल उपकरणांच्या विक्रीपूर्वी आंतरराष्ट्रीय मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी (आयएमईआय -15 अंकी संख्या) सांगणे अनिवार्य केले आहे. मोबाईल नेटवर्ककडे आता आयएमईआय – 15 अंकी क्रमांक असेल. त्यामुळे मोबाईल चोरी झाल्या झाल्या नेटवर्क त्याची माहिती मिळेल.