टीम AM : दहावी – बारावीच्या निकालाची तयारी आता युद्धपातळीवर सुरु असून 90 टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल 3 ते 4 जून रोजी जाहीर होईल. तर दहावीचा निकाल 10 जूनपर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने बोर्डाकडून नियोजन सुरु आहे.
पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी – मार्च महिन्यात दहावी – बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली, पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ राबविला. त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे.
सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी झाल्यावर आता निकालाची तयारी सुरु झाली आहे. बोर्डाकडून निकालाच्या दृष्टीने आवश्यक 90 टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दहावी-बारावीनंतर पुढील प्रवेशासाठी विलंब होणार नाही, याची खबरदारी बोर्डाकडून घेतली जात आहे. त्याअनुषंगाने निकाल वेळेत लागावेत, असे नियोजनही बोर्डाने केले आहे. पहिल्यांदा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.
मेअखेरीस निकाल जाहीर न झाल्यास 3 ते 4 जूनपर्यंत तो निकाल लागेल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर सहा ते आठ दिवसांत म्हणजेच 10 जूनपर्यंत दहावीचा निकाल लागावा, अशीही तयारी झाली आहे.