टीम AM : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अखेर लागला आहे. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या वर्तनावरून त्यांनी पक्षशिस्तीचं उल्लंघन केलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी, असा युक्तीवाद ठाकरेंच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला होता.
सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवेळीही 5 न्यायाधिशांच्या घटनापीठाने आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप कसा करू शकतो? असा मुलभूत प्रश्न उपस्थित केला होता. सुप्रीम कोर्टाच्या या टिप्पणीमुळे आमदार अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे जाईल, अशी शक्यता तेव्हापासून वर्तवण्यात येत होती.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निर्णय देताना उद्धव ठाकरेंना दिलासा देण्यास नकार दिला. कोर्टानं म्हटलं की, उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला समोरे गेले नाहीत. सुप्रीम कोर्टानं पुढे म्हटलं की, उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिला म्हणून ही स्थिती पूर्ववत करता येणार नाही. त्यामुळं सर्वात मोठा पक्ष भाजपच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी शपथ देणे योग्य आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टानं 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडं सोपवला आहे. त्यामुळं आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच याबाबत निर्णय घेणार आहेत. पण हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असंही सुप्रीम कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.