महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता, संपूर्ण देशाचं लागलं लक्ष

टीम AM : महाराष्ट्रातील सरकार राहणार की जाणार, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार ? याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा निकाल प्रलंबित असून आता याचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणाचे भवितव्य ठरवणारा हा निकाल उद्या म्हणजे 11 मे रोजी लागणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान ही टिपण्णी केली आहे.

घटनापीठाकडून उद्या दोन महत्वाचे निकाल लागण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी दिले आहेत. त्यामुळे सत्तासंघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण पक्षचिन्ह आणि शिवसेना पक्षनाव शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाने या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली असून याप्रकरणी उद्याच निकाल जाहीर होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांनी संकेत दिले आहेत.