महाराष्ट्रातून तीन महिन्यात 5 हजारांहून अधिक मुली बेपत्ता

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची माहिती

टीम AM : महाराष्ट्रात रोज सरासरी 70 मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत महाराष्ट्रातून 5 हजार 510 मुली बेपत्ता झाल्या असल्याची धक्कादायक माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. यामुळे शिंदे – फडणवीस सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

रूपाली चाकणकर म्हणाल्या की, जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात 1600 मली बेपत्ता झाल्या, फेब्रुवारी महिन्यात 1810 तर एप्रिल महिन्यात 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या वाढते आहे हे आपल्यासाठी चिंताजनक आहे. यामध्ये 2020 पासून हरवलेल्या व्यक्तींबाबत दुर्दैवाने महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी खरंतर फार मोठी यंत्रणा कार्यरत असणं आणि त्या यंत्रणेचा वापर केला जाणं आवश्यक आहे. पण तसं होताना दिसत नाही. राज्य महिला आयोगाच्या वतीने गेल्या 16 महिन्यांपासून आम्ही सातत्याने पाठपुरवठा करतो आहे.

हरवलेल्या व्यक्तींचा विभाग मुंबई यांच्याकडून आम्ही माहिती घेत असतो. त्यांच्याकडून अहवाल मागवत असतो. प्रत्येक राजकारणाऱ्यांकडे मिसिंग सेल आहे. तो कार्यकरत आहे की नाही ? मागच्या महिन्यात महिला आयोगाने नागपूरमध्ये ‘अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग’ असा एक प्रोग्रामही आम्ही घेतला. यामध्ये राज्याचे गृहमंत्रीही उपस्थित होते. सद्यस्थितीतही आव्हानं आणि उपाययोजना यांचा अहवाल आम्ही गृह विभागाला पाठवलाही आहे. मिसिंगमध्ये ज्या तक्रारी समोर येतात त्या मुलींचा शोध लागला नाही. तर या मुलींची दिशाभूल केली जाते आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात. ही बाब अतिशय चिंताजनक आहे, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.

महत्वाचं म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचं स्पष्ट आहे. मार्च महिन्याची आकडेवारी पाहता, पुण्यातून 2258 मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यानंतर नाशिकमधून 161, कोल्हापूर 114, ठाणे 133, अहमदनगर 101, जळगाव 81 तर सांगलीतून 82 मुली बेपत्ता झाल्या आहेत.