मराठी चित्रपट ‘TDM’ ला थिएटर्समध्ये मिळेना स्क्रीन : अजित पवारांनी घेतली दखल, ट्वीट करत म्हणाले…

टीम AM : भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, पण थिएटर मालकांकडून चित्रपटाला प्राईम टाइम व स्क्रीन उपलब्ध करून दिल्याजात नाहीत. त्यामुळे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच एका थिएटरमध्ये बोलताना या चित्रपटातील कलाकारांना अश्रू अनावर झाले होते. याबद्दलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी ट्वीट करत या चित्रपटाला स्क्रीन न मिळणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी संबंधितांना या चित्रपटाला प्राईम टाइम स्लॉटमध्ये स्क्रिन उपलब्ध करून देण्यास सांगितलं आहे.

‘राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी,’ असं अजित पवार यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

एका थिएटरमध्ये बोलताना दिग्दर्शक भाऊसाहेब म्हणाले, ‘मला शोसाठी वेळ द्या, आमचा सिनेमा चालला नाही तर घेऊ नका, पण किमान आमचा चित्रपट दाखवा लोकांना आणि लोकांना ठरवू द्या तो कसा आहे ते. या चित्रपटगृहाचेच उदाहरण घ्या एवढे लोक आमचा सिनेमा बघायला इथे आले आहेत म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला आणखी एक शो द्या, पण त्यांनी तो दिला नाही. हा असा भेदभाव आमच्याबरोबर केला जात असल्याने आता माझी चित्रपट बनवण्याची इच्छा राहिलेली नाही.’ यावेळी चित्रपटातील मुख्य अभिनेता पृथ्वीराज थोरात रडू लागला, तर अभिनेत्री कालिंदीही भावुक झाली होती.