बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे

टीम AM : जिल्ह्याचा समतोल विकास साधत असताना प्रत्येक क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येत असून बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री सावे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

विकास योजना राबविण्यात जिल्हा अग्रेसर असल्याचे सांगत पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवी वर्षात जिल्ह्यातील अनेक व्यक्ती व संस्थाचा राज्य व देश पातळीवर गौरव होतो आहे. महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील महिला सरपंच शेख मुन्नाबी मुजफ्फर पटेल यांच्या गौरवामुळे महिला सक्षमीकरणाच्या या पर्वात बीड जिल्हा मागे राहिलेला नसल्याचे दिसुन आले आहे. जिल्हाधिकारी पदाची सूत्र देखील दीपा मुधोळ – मुंडे या समर्थपणे सांभाळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

वीज पडून जनावरे दगावलेल्या पशुपालकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचे वाटप

राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी गेवराई तालुक्यातील तळणेवाडी, बोरीपिंपळगाव या ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीची पंचनामे युद्धपातळीवर करुन अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

तसेच बीड तालुक्यातील तिप्पटवाडी तसेच घोसापुरी या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन वीज पडून जनावरे दगावलेल्या पशुपालकांची प्रत्यक्ष भेट घेतली. तिप्पटवाडी येथील शेतकरी अनंत नामदेव शेंडगे यांचे व घोसापुरी येथील शेतकरी श्रीहरी कुटे यांचे प्रत्येकी दोन बैल वीज पडून दगावले होते. या पशुपालकांची प्रत्यक्ष भेट घेत मदतीचे धनादेश या पशुपालकांना पालकमंत्री सावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.