टीम AM : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच मराठवाड्यात अनेक भागांत अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. सोबतच जोरदार गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट पाहायला मिळाला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात मोठ्याप्रमाणावर जीवित हानी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मराठवाड्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 25 जणांचा मृत्यू झाला आहे तर 29 जण जखमी झाले आहेत. त्यासोबतच 452 लहान मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल 1593 कोंबड्या दगावल्या आहेत. सोबतच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.
नुकसान भरपाई देण्याची मागणी
आधीच अतिवृष्टीमुळे खरीपाचे हंगाम हातून गेले आहे. त्यामुळे रब्बी हंगामात काहीतरी हातात येईल, अशी अपेक्षा असताना मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.