दोन लाचखोर लिपिक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

टीम AM : प्रवास भत्ता धनादेश मंजूर करण्यासाठी फोनवरून लाच मागणाऱ्या व धनादेश देण्यासाठी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या या दोन्ही लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीडच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी दोन्ही लाचखोर लिपिकावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कुंदन अशोक गायकवाड (प्रथम लिपिक, मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता कार्यालय, उस्मानाबाद), पोपट श्रीधर गरुड (वरिष्ठ लिपिक, लघु पाटबंधारे उपविभाग आष्टी, जि. बीड) असे लाचखोर आरोपींची नावे आहेत. यातील कुंदन गायकवाड याने तक्रारदार लोकसेवक 32 वर्षीय पुरुष यांचा प्रवास भत्ता 19 हजार 410 मंजूर करण्यासाठी फोनवरून 2 हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच धनादेश देण्यासाठी पोपट गरुड याने 19 हजार 410 रकमेची 20 टक्के म्हणजे 3 हजार 882 रुपये लाचेची मागणी केली. 

परंतू तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड यांच्याकडे तक्रार केली. पडताळणी करुन बीड युनिटने सापळा लावून पोपट श्रीधर गरुड यास 3 हजार 880 रुपयांची लाच स्वीकारताना लघु पाटबंधारे उपविभाग आष्टी, जि. बीड कार्यालयात पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. सदरील सापळा सोमवारी (दि. 24) ला. प्र. वि. औरंगाबादचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, भारत गारदे, संतोष राठोड, अमोल खरसाडे, गणेश म्हेत्रे यांनी यशस्वी केला.