बालविवाह : नवरदेव, आई – वडील यांच्यासह 18 जणांवर गुन्हा दाखल

टीम AM : बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारची जनजागृती करण्यात येत असताना पुन्हा बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्‍यात बालविवाह करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बालविवाह प्रकरणी वाजंत्री, आचारी, नवरदेव, आई – वडील यांच्यासह 18 जणांवर वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

वडवणी तालुक्यातील देवळा (बु.) येथे रविवार दि. 23 रोजी दुपारी बालविवाह झाला. याची माहिती चाईल्ड लाईनला मिळाल्यानंतर वडवणीचे तहसीलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे कळताच काही मंडळींनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली. 

सदरील घटनेचा पंचनामा करण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रकाश सीरसेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यादव, पोलीस हवालदार आदिनाथ तांदळे, अशोक आघाव, वैचिष्ठ वाघमारे, ग्रामसेवक वसंत पवार, तलाठी शिवाजी खोशे आणि चाईल्ड लाईन बीडचे सदस्य संतोष रेपे, प्रकाश काळे यांची उपस्थिती होती. 

या प्रकरणी ग्रामसेवक वसंत भगवान पवार यांच्या फिर्यादीवरून आचारी, वाजंत्री, नवरदेव, आई – वडील, नातेवाईकांसह 18 जणांवर बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 चे कलम 9,10,11 नुसार वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार आदिनाथ तांदळे करत आहेत.