टीम AM : बीड जिल्ह्याचं नाव आलं की आठवतो तो दुष्काळ आणि ऊसतोड कामगार. मात्र, आता याच बीड जिल्ह्यातील सोनाखोटा येथील ऊसतोड कामगार हजारे दाम्पत्य इन्स्टाग्रामवर व्हिडिओ टाकून स्टार झालंय.
बीड जिल्ह्यातल्या डोंगर कपारीत असलेल्या सोनाखोटा येथील ऊसतोड कामगार हजारे दाम्पत्य. तशी गावची लोकसंख्या 5 हजार आहे. मात्र, हजारे कुटुंब भूमिहीन असल्याने त्यांना प्रत्येक वर्षी ऊसतोडणीसाठी परराज्यात जावे लागते. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून ऊस तोडणीला जाणारं हजारे कुटुंब आज अचानक महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालंय. त्यामागचं कारणही तसंच आहे.
अशोक हजारे आणि त्यांच्या पत्नी मनिषा हजारे यांना इन्स्टाग्रामचा छंद जडला. आपल्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित व्हिडीओ ते इन्स्टावर अपलोड करू लागले. तसा पहिला व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर एप्रिल 2021 ला टाकला होता. मात्र, त्यांच्या व्हिडीओला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
सोनाखोटा येथील रहिवासी असलेलं हजारे दाम्पत्य सध्या आपल्या गावी आहेत. ते यावर्षी कर्नाटकात असलेल्या बाळासाहेब शिवशक्ती साखर कारखान्यात ऊस तोडणीचं काम करतं होते. ऊस तोडणीसारख्या मेहनतीच्या कामातून विरंगुळा म्हणून त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली.
आपल्या दैनंदिन आयुष्यातील क्षण त्यांनी इन्स्टावर शेअर केले. त्यांचा कारखान्यावर बैलगाडीतून जात असलेला दोघांचा व्हिडीओ 24 जानेवारीला व्हायरल झाला.
मनीषा हजारे आणि अशोक हजारे यांचं छोटस घर आहे. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी असं पाच जणांचं कुटुंब आहे. ऊसतोडणीसाठी ते मुलांना सोबत घेऊन जातात. त्यामुळे मुलांचं शिक्षण या हंगामात थांबतं, यात त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान, फक्त पाचवी शिकलेल्या मनीषा हजारे ह्या इन्स्टाग्रामवर रिल्स बनवून फेमस झाल्या आहेत.