अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांची कारवाई
टीम AM : अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून आज दोन ठिकाणी हातभट्टीच्या दारु अड्यावर धाडी टाकत केलेल्या कारवाईत 2 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावठी हातभट्टी दारू अड्यावर कारवाई करण्यात आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील राडी तांडा येथे हातभट्टी दारू अड्यावर धाड टाकत गावठी हातभट्टी दारूचे रसायन भरलेले 200 लिटरचे 10 प्लास्टिक बॅरल मधील 60 हजार रुपये किंमतीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे.
वाण नदीपात्रात 200 लिटरचे 22 लोखंडी भरलेले बॅरल त्याची किंमत 1 लाख 56 हजार रुपयांची गावठी हातभट्टी दारूचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. अश्या वेगवेगळ्या दोन कारवाईत एकूण 2 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. दरम्यान, दोन वेगवेगळ्या कारवाईतील चारही आरोपी पळून गेले असून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.