अभिनेत्री सुषमा शिरोमणी : धमाकेदार ‘गुलछडी’ च्या रिलीजला 38 वर्ष पूर्ण

टीम AM : सुषमा शिरोमणीच्या धमाकेदार, मसालेदार मनोरंजक चित्रपटाची आपली एक ओळख निर्माण झाली. तिच्या हुकमी ऑडियन्सचा कायमच प्रतिसाद मिळत राहिला.

याच यशस्वी वाटचालीतील ‘गुलछडी ‘ सेन्सॉर 31 डिसेंबर 1984 च्या मुंबईतील प्रदर्शनास 12 एप्रिल 1985 ला अडतीस वर्ष पूर्ण होत आहेत. त्या काळात मराठी व हिंदी चित्रपट टप्प्याटप्प्याने प्रदर्शित होत. 

‘गुलछड’ सर्वप्रथम पुणे शहरात वसंत चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्यानंतरच्या काळात उषा (कोल्हापूर), छाया (सोलापूर), सर्कल (नाशिक), चित्रा (नगर), सदासुख (सांगली), दुर्गा (बारामती) असा एकेक करत अनेक शहरात रिलीज झाल्यावर मग त्याचे मुंबईत आगमन झाले. 

शिरोमणी चित्र या बॅनरखालील या चित्रपटाची कथा, पटकथा, निर्मिती, दिग्दर्शन व मध्यवर्ती भूमिका सुषमा शिरोमणीची आहे. या चित्रपटाचे संवाद दिनकर द. पाटील आणि शंकर पाटील यांचे आहेत. गीते जगदीश खेबूडकर यांची तर संगीत राम लक्ष्मण यांचे आहे. छायाचित्रण राम अल्लम यांचे तर संकलन बाळ कोरडे यांचे आहे.

या चित्रपटात तनुजा, डाॅ. श्रीराम लागू, अरुण सरनाईक, अशोक सराफ, कुलदीप पवार, मा. भगवान, दिनकर इनामदार, छाया सांगावकर, सुषमा शिरोमणी आणि पाहुणी कलाकार रति अग्निहोत्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘पब्लिकला मी दिलं आमंत्रण’, ‘गुलछडी ग गुलछडी’, नवतीच्या अंगणात ही गाणी लोकप्रिय आहेत.