‘बार्टी’ च्या 861 विद्यार्थ्यांना मिळणार फेलोशिप : शिंदे सरकारचा निर्णय

टीम AM : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीप करीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

या मागणी संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि शिष्टमंडळाचे प्रतिनीधी उपस्थित होते. यावेळी ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्य केली. त्याचे स्वागत करतानाच विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, असा मुद्दाही यावेळी विद्यार्थ्यांनी मांडला.

फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढील वर्षापासून बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देश दिले.

दरम्यान, या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली नसती तर न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला होता. राज्य सरकारच्या बार्टी पुणे मार्फत मिळणार्‍या शिष्यवृत्ती पासून वंचित असलेल्या 861 पीएचडी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश जगताप यांनी दिली होती. समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी तीन योजना कार्यान्वित आहेत. यामध्ये प्रामुख्याने सारथी, महाज्योती, बार्टी यांचा समावेश आहे. सारथी मधून खुल्या वर्गात येत असणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते तर ओबीसी करिता महाज्योतीतून आणि बार्टीतून एससी, एसटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असते. केंद्र शासनाच्या युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन (यूजीसी) अख्यारित मोडत असून बार्टीची शिष्यवृत्ती बंद केली आहे. तर सारथी व महाज्योतीची शिष्यवृत्ती वाढविली गेली आहे. पुणे बार्टी या संस्थेत अनुसूचित जाती जमातीचे विद्यार्थी या संस्थेद्वारे शिक्षण घेत असून 861 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बंद पडल्याने शैक्षणिक फटका बसणार आहे, असेही ॲड.  जगताप यांनी सांगितले होते.