टीम AM : ज्येष्ठ गझल गायिका चित्रा सिंह यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1945 रोजी झाला. चित्रा सिंह या ज्येष्ठ गझल गायक जगजीत सिंह यांच्या पत्नी होत. जालंधरमध्ये जगजीत सिंह नोकरी करत असले तरी त्यांच्या डोक्यात त्यावेळी काहीतरी वेगळेच सुरू होते.
मार्च 1965 मध्ये जगजीत सिंह कुणालाही न सांगता मुंबईला पळून गेले. येथे त्यांच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला. मुंबईत आल्यानंतर काहीच महिन्यांनंतर चित्रा दत्ता यांच्या सोबत त्यांची ओळख झाली.
चित्रा सिंह या विवाहित होत्या. चित्रा यांचे पती देबू प्रसाद दत्ता ब्रिटानिया बिस्कीट कंपनीत एका मोठ्या पदावर होते. देबू प्रसाद यांना साऊंड रेकॉर्डिंगमध्ये प्रचंड रस होता. त्यामुळे त्यांनी घरातच एक रेकॉर्डिंग स्टुडिओ बनवला होता. एका रेकॉर्डिंग दरम्यान जगजीत आणि चित्रा यांची ओळख झाली आणि दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पण काहीच वर्षांत या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.
जगजीत यांना चित्रा यांच्यासोबत लग्न करायचे होते. पण त्यांचे लग्न झाले असल्यामुळे काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पण त्यांनी थेट चित्रा यांच्या पतीकडे जाऊन त्यांचा हात मागितला होता. पुढे चित्रा आणि देबू प्रसाद यांचा घटस्फोट झाला आणि 1969 मध्ये चित्रा आणि जगजीत यांचे लग्न झाले. चित्रा व जगजीत यांनी अनेक गाणी एकत्र गायली होती.
जगजीत आणि चित्रा यांना एक मुलगा होता. पण त्यांचा मुलगा विवेक 18 वर्षांचा असताना एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. तरुण मुलाच्या मृत्यूचा धक्का चित्रा यांना सहन झाला नाही. यानंतर त्यांनी गाणे कायमचे सोडले. या घटनेने जगजीत यांनाही हादरवून सोडले होते.
शब्दांकन : संजीव वेलणकर