टीम AM : अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटीला यंदा विक्रमी नोंदणी झाली आहे. आतापर्यंत 6 लाख 19 हजार 33 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
यामध्ये पीसीबी ग्रुपसाठी 2 लाख 95 हजार 844 आणि पीसीएम ग्रुपसाठी 3 लाख 23 हजार 189 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सीईटी 9 मेपासून सुरू होणार आहे.
तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण व कला शिक्षणांतर्गत येणाऱ्या 16 विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येतात. यामध्ये एमएचटी सीईटी मोठ्या संख्येने विद्यार्थी नोंदणी करतात. अजूनही 1 लाख 20 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे हे विद्यार्थीही येत्या चार दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी नोंदणीत मोठ्या संख्येने वाढ होण्याची शक्यता आहे.
गतवर्षी पीसीएम व पीसीबी या दोन्ही ग्रुपसाठी राज्यातून 5 लाख 99 हजार 616 विद्यार्थी तर परराज्यातून 16 हजार 550 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या तुलनेत यंदा आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एमएचटी सीईटी – पीसीएम ग्रुपची परीक्षा 9 मे रोजी सुरू होणार आहे, तर ती परीक्षा 13 मे रोजी संपणार आहे, तर पीसीबी ग्रुपची परीक्षा 15 मेपासून सुरू होईल. ही परीक्षा 20 मे रोजी संपणार आहे. या कालावधीत परीक्षा विविध सत्रात पार पडणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना सत्र आणि वेळा निश्चित करण्यात येणार आहेत.