टीम AM : अभिनेत्री आणि खासदार अशी ओळख असलेल्या जया बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. संसदेत परखड मतं मांडणाऱ्या जया बच्चन यांनी एकेकाळी त्यांच्या अभिनयाने अनेकांना भुरळ घातली आहे. इतकचं नाही तर जया बच्चन आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची लव्ह स्टोरी देखील खूप खास आहे.
सिनेसृष्टीत यशाचं शिखर गाठणाऱ्या बिग बींच्या आयुष्यात जया बच्चन यांची झालेली एण्ट्री आणि त्यांची लव्ह स्टोरी देखील एखाद्या सिनेमाच्या कथानकाप्रमाणे फिल्मी आहे.
जया बच्चन यांच्यामुळेच अमिताभ बच्चन यांचं करिअर चमकलं असही म्हंटलं जातं. करिअरच्या सुरुवातीच्या काळात अमिताभ बच्चन यांचे सलग 12 सिनेमा फ्लॉप झाले. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी कोणतीही अभिनेत्री तयार नव्हती. बिग बी मुंबई आणि सिनेसृष्टीला पाठ फिरवणार होते. याचवेळी मात्र त्यांना ‘जंजीर’ सिनेमासाठी कास्ट करण्यात आलं. या सिनेमात त्यांची जया बच्चन यांच्यासोबत जोडी झळकणार होती. या सिनेमानंतर बिग बींच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये नवं वळण आलं.
खर तर जया बच्चन पहिल्या नजरेतच बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात पडल्या होत्या. दोघांची पहिली भेट पुण्यातील फिल्म इंस्टीट्यूटमध्ये झाली. यावेळी जया बच्चन तिथं अभिनयाचे धडे घेत होत्या. तर अमिताभ बच्चन मात्र बॉलिवूडमध्ये धक्के खात होते. अमिताभ बच्चन यांच्याबद्दलच्या भावना जया यांनी मैत्रिणींना सांगितल्या होत्या. यावेळी अमिताभ बच्चन खूपच बारीक असल्याने आणि ते उचं असल्याने जया बच्चन यांच्या मैत्रिणी त्यांना चिडवत असे. तर जया बच्चनदेखील मैत्रिणीसोबत यावरून भांडायच्या. अमिताभ बच्चन यांनी एका मासिकाच्या पानावर जया बच्चन यांचा फोटो पाहिला होता. तेव्हाच त्यांना जया बच्चन आवडल्या होत्या.
जया आणि अमिताभ बच्चन यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. त्यात ‘जंजीर’ या सिनेमाच्या निमित्ताने दोघांनी भरपूर वेळ एकत्र घालवला. याचवेळी त्यांचं नातं आणखी घट्ट झालं. या सिनेमाला मोठं यश मिळालं होतं. या यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी दोघांनाही लंडनला जायचं होतं. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या वडिलांनी एक अट घातली. लंडनला जायचं असेल तर आधी लग्न करा आणि मग फिरा. वडिलांच्या आज्ञेचं पालन करत अमिताभ बच्चन यांनी 1973 साली जया बच्चन यांच्यासोबत लग्न गाठ बांधली आणि दोघांचा संसार सुरू झाला.
बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन पहिल्यांदा ‘बंसी बिरजू’ या सिनेमात एकत्र झळकले होते. त्यानंतर ते जंजीर’, ‘अभिमान’, ‘चुपके – चुपके’, ‘मिली’, ‘शोले’ या सिनेमांमधून एकत्र झळकले. त्यांच्या या जोडीला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती. जया बच्चन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.