नवीन शैक्षणिक धोरण : पदवी अभ्यासक्रमात होणार बदल, विद्यार्थ्यांना विषय निवडण्याची मुभा

टीम AM : दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षेच्या मिळालेल्या गुणांमध्ये आता आधीच्या वर्षाचे गुण मिळवले जाणार आहेत. तसेच सीबीएसईसारख्या केंद्रीय मंडळाच्या परीक्षा पद्धतीत समन्वय साधून बारावीची परीक्षा दोन वेळा ‍घेण्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी राज्यात नवीन शिक्षण धोरणाच्या अनुसार राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम मसुदा हा सरकारने तयार केला आहे.

मसुद्यात अनेक प्रकारच्या नवीन शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नवीन मूल्यांकन पद्धती विकसित केल्या जाणार आहेत तर पदवीच्या अभ्यासक्रमांतही आमूलाग्र बदल केले जाणार असून त्यामध्ये श्रेयांक पद्धतीत विद्यार्थ्यांना विषय निवडण्याची मुभा मिळणार आहे.

या नव्या शिफारशींमध्ये देशभरात वर्ष 2023 – 24 च्या दहावी, बारावीच्या परीक्षेपासून सीबीएसई मंडळाच्या परीक्षा मूल्यांकन पद्धतीत बदल केले जाणार आहेत. यात क्षमतेवर आधारित प्रश्न विचारण्यात येतील. प्रश्नपत्रिकेतील लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचे महत्त्वही कमी केले जाणार असून सुमारे 50 टक्के प्रश्नपत्रिका ही बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असणार आहे.

दुसरीकडे राज्यातही बारावी परीक्षा मंडळाच्या परीक्षा या वर्णनात्मक व वैकल्पिक अशा दोन पद्धतीने होऊ शकतील सरकार त्यावर येत्या काळात निर्णय घेईल. राज्यातील शिक्षण क्षेत्रातील आणि विविध क्षेत्रातील जनतेकडून त्याच्यावर सूचना मागण्यात येतील आणि मग त्यावर अंतिम निर्णय सरकार घेणार आहे. राज्यात तब्बल 17 वर्षांनी राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा प्रस्तुत करण्यात आलेला आहे.

नवीन शिफारसींनुसार प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

  • दहावीमध्ये एकूण प्रश्नांपैकी 50 टक्के प्रश्न हे बहुपर्यायी असतील
  • एखाद्या घटनेवर किंवा इतर कोणत्याही समस्येवर आधारित प्रश्न विचारले जातील
  • वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भाग केवळ 20 टक्केच
  • लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्न यंदा 30 टक्क्यांपर्यंत कमी केले
  • दुसरीकडे बारावीमध्ये 40 टक्के प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील
  • एकात्मिक स्वरूपाचे व केस स्टडीवर आधारित प्रश्न विचारले जातील
  • लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रकारच्या प्रश्नांचे मागील वर्षाच्या 50 टक्के प्रमाण यंदा 40 टक्क्यांवर आणले आहे.

नववी आणि अकरावीतही बदल

येत्या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीबरोबरच सीबीएसई मंडळाने नववी आणि अकरावीच्या परीक्षेतही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नववी आणि अकरावीच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर आधारित प्रश्न विचारण्यात येणार असून लघु आणि दीर्घ प्रकारच्या प्रश्नांचे महत्त्व कमी करण्यात येणार आहे. लघु आणि दीर्घ उत्तरांच्या एकत्रित प्रश्नांना 50 ऐवजी 40 टक्के गुण असतील, असे सीबीएसई मंडळाने म्हटले आहे.

पदवी अभ्यासक्रमात होणार बदल

  • एखादा विद्यार्थी जो अभ्यासक्रम निवडेल त्यामध्ये 50 टक्के अभ्यासक्रम हा मुख्य विषय असेल
  • उर्वरित विषय 50 टक्के अभ्यासक्रम म्हणून शिकवले जातील
  • श्रेयांक पद्धतीतमध्ये मेजर, मायनर, इलेक्टिव्ह, स्कील कोर्सेस आदी विषय निवडण्याची मुभा मिळणार आहे.