प्रतिक पुरी
पुढचा सप्ताह हा विशेष महत्त्वाचा आहे. 11 एप्रिल रोजी महात्मा जोतिराव फुले यांची जयंती आहे. लगेच तीन दिवसांनी 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती आहे. या दोन्ही माणसांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सामान्य जनतेला त्यांचं स्वतंत्र अस्तित्व मिळवून देण्यासाठी काम केलं आहे. 1890 मध्ये जोतिबा वारले आणि 1891 मध्ये बाबासाहेब जन्माला आहे. एकप्रकारे फुल्यांचं थांबलेलं कार्य पुढे चालवण्याची जबाबदारी बाबासाहेबांवर आली.
स्वातंत्र्य, समता, बंधुता हे केवळ शब्द नाहीत तर त्या माणसाच्या जगण्याचा मूलाधार आहेत. त्याच्या माणूसकीला जीवंतपणा देणाऱ्या प्राणशक्ती आहेत. यांच्याशिवाय माणसाच्या माणूसपणाला अर्थ येत नाही.
या तिन्हींचा या ना त्या कारणाने संकोच होत असण्याच्या काळात फुले आणि आंबेडकर यांचं येणं हा खूप मोठा दिलासा होता. जातीबंधनांमुळे केवळ व्यक्ती स्वातंत्र्याचाच नाहीतर मानसिक व बौद्धिक स्वातंत्र्याचाही संकोच होत असतो. त्या संकोचातून व्यक्तीची सुटका करण्याचा मार्ग काय असू शकतो हे फुल्यांच्या कार्यातून दिसून येतं.
माणसाला पशुत्वाच्या पातळीवर आणून सोडणाऱ्या जाती व्यवस्थेला थेट अंगावर घेत त्याविरोधात आजन्म लढणारे बाबासाहेब हे समतेचे प्रतीक आहेत. घटनेच्या माध्यमातून आज समतेचा विशाल मांडव या देशावर घालण्यात आला आहे ज्यात शेकडो जातीपंथाचे लोक त्यांच्या घटनादत्त अधिकारांसह जगू शकतात, त्याच्यासाठी लढू शकतात. समता ही केवळ आचारा विचारांची नाही तर ती मानसिकतेचीही असावी. तरच तिला अर्थ येतो.
स्वातंत्र्य व समता जिथे असते तिथे बंधुता असते, नव्हे असायलाच पाहिजे. पण तसं होईलच असं नसतं. तसं ते होत नसेल तर आपल्या वागण्यात काहीतरी चुक घडते आहे, असे समजायला हरकत नाही. सध्याच्या वातावरणात तर बंधुतेचं नखही नजरेस दिसून पडत नाही. हे असं का घडलं याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे.