टीम AM : लोणंद – नीरा रस्त्यावर गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. एका भरधाव एसटीने दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघा मित्रांना जोरदार धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघे तरुण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिंपरे आणि थोपटेवाडी येथील आहेत. तिन्ही तरुण हे आई – वडिलांना एकुलते एक असल्याने तिन्ही कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
ओकांर संजय थोपटे, पोपट अर्जुन थोपटे आणि अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिपंरे खुर्द ता. पुरंधर) असे या अपघात ठार झालेल्या तीन मित्रांनी नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणंद – निरा रोडवर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी बस क्रमांक एमएच 20 बीएल 4158 ही निरेकडून लोणंदला जात होती.
यावेळी वरील तिघे हे मोटरसायकल वरून जात होते. या बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पीएसआय गणेश माने व त्यांचे सहकार्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
अपघातातील वाहने बाजूला करून मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या ठिकाणची वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. थोपटेवाडी ग्रामदैवत असलेल्या हनुमानाचा यात्रा उत्सव सुरू होता. मात्र मुलं गेल्याची खबर येताच संपूर्ण यात्रेवर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर यात्रा थांबवण्यात आली.