जयाप्रदा यांचा वाढदिवस : लग्नानंतरही त्यांना मिळाला नाही पत्नीचा दर्जा, ‘या’ कारणामुळे बिघडलं नातं

टीम AM : हिंदी सिनेसृष्टीत 60 ते 80 च्या दशकात नाव बदलण्याचा मोठा ट्रेंड होता. अनेक कलाकार फक्त मोठ्या पडद्यासाठी आपलं नाव बदलायचे. त्याचप्रमाणे ललिता राणी झाल्या जयाप्रदा. ललिता उर्फ जया यांचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी आंध्र प्रदेशात झाला.

जयाप्रदा त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या, आजही त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. विशेषतः त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल.

1986 मध्ये जयाप्रदा यांनी चित्रपट निर्माते श्रीकांत नाहटा यांच्याशी लग्न केले. जया यांनी करिअर शिखरावर असताना निर्माते श्रीकांत नाहटाशी लग्न केले. 22 जून 1986 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नाआधी जयाप्रदा आणि श्रीकांत नाहटा यांच्या नात्याची मीडियामध्ये खूप चर्चा व्हायची. श्रीकांत आणि ते चांगले मित्र असल्याचे सांगून जयाप्रदा अशा बातम्यांचे सतत खंडन करत राहिल्या. जयाप्रदा या श्रीकांतच्या दुसऱ्या पत्नी होत्या.

जयापूर्वी श्रीकांत यांचे चंद्राशी लग्न झाले होते, ज्यांना तीन मुले आहेत. श्रीकांत आणि जयाप्रदा यांच्या लग्नाचाही तेव्हा बराच वाद झाला होता. कारण श्रीकांत यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता जया यांच्याशी लग्न केले होते. या घटनेनंतर, अनेक बातम्या प्रकाशित झाल्या. ज्यात जयाप्रदा यांना घर तोडण्यासाठी जबाबदार धरले गेले.

जयाप्रदाशी लग्न झाल्यानंतरही श्रीकांत यांना पहिल्या पत्नीपासून मुले झाली. दुसरीकडे, जयाप्रदा यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते की, त्यांना मूल हवे होते, पण पतीला नको होते, याचमुळे त्यांच्यातलं नातं बिघडू लागलं. आता विवाहित असूनही जयाप्रदा एकट्याच राहतात.

जयाप्रदा यांनी त्यांच्या तीन दशकांच्या दीर्घ सिने करिअरमध्ये जवळपास 200 चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर त्या राजकारणाकडे वळल्या. जयाप्रदा यांनी 1994 मध्ये तेलगु देसम पक्षात प्रवेश केला. 2000 मध्ये त्यांनी टीडीपी सोडली आणि समाजवादी पक्षात प्रवेश केला. जयाप्रदा यांना पक्षात आणण्यात अमरसिंह यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. अमरसिंह यांनी समाजवादी पक्षापासून फारकत घेतली तेव्हा जया यांनीही राष्ट्रीय लोकदल पक्षात सहभागी होण्यासाठी समाजवादी पक्ष सोडला. त्या वर्षातली निवडणूकही त्या हरल्या. सध्या जयाप्रदा भाजपमध्ये आहेत.