टीम AM : राज्यातील नायब तहसीलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील. यासाठी प्रशासनाची मंत्रालयात 5 एप्रिल रोजी बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने अहमदनगर येथील कार्यक्रमादरम्यान महसूल मंत्री विखे पाटील यांना नायब तहसीलदारांच्या विविध मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी संदीप चव्हाण, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, अमोल निकम आदी उपस्थित होते.
तालुकास्तरावर नायब तहसीलदार हे महत्त्वपूर्ण व जबाबदारीचे राजपत्रित वर्ग दोनचे पद आहे. त्यामुळे नायब तहसीलदारांच्या मागण्यांबाबत शासन लवकरच प्रशासनाबरोबर बैठक घेऊन मार्ग काढेल, असे महसूल मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.