घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याकडून छापे टाकण्यात आले. त्यामुळे परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.
घाटनांदूर ग्रामपंचायतमध्ये सरपंच महेश गारठे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत गावातील अवैध दारू, गावठी हातभट्टी, गुटखा, मटका यांसारख्या अवैध धंद्यांवर बंदी घालून अवैध धंदे चालकांवर कारवाई करण्यात यावी, असा ठराव घेण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर येथील बहुजन विकास मोर्चाने अवैध धंदे बंद करावे, अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंबाजोगाई तसेच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी यांच्याकडे सादर करून कारवाई न झाल्यास 13 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंबाजोगाई येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
येथील ग्रामसभेत मंजूर ठराव आणि बहुजन विकास मोर्चाने सादर केलेल्या निवेदनाची दखल घेऊन अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी यांच्या पथकाने येथील अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई केली.
या कारवाई दरम्यान शरद जालिंदर मिसाळ, दयानंद लहू मिसाळ यांच्याकडून गावठी हातभट्टी जप्त करून नष्ट करण्यात आली तर जीवन अंधारे, संभाजी जाधव आणि शिवशंकर चोपडे यांच्याकडून सुमारे दहा हजार रुपयांची विदेशी दारू जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस निरीक्षक बालक कोळी यांच्या पथकाकडून रविवारी झालेल्या कारवाईत अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी यांच्यासह सहा. पो. नि. श्रीनिवास सावंत, पोलीस उपनिरीक्षक मिसाळ, पो. हे. कॉ. मुंडे, देशमाने, श्रीमती बोंडले, पो. अं. धुमाळ, केदार आणि राऊत आदी सहकारी सोबत होते.