राज्यातील 600 तहसीलदार आणि 2200 नायब तहसीलदार आजपासून संपावर : कामांना लागला ‘ब्रेक’

अंबाजोगाईतील एक तहसीलदार आणि तीन नायब तहसीलदारांचा समावेश

टीम AM : राज्यभरातील 2200 नायब तहसीलदार आणि 600 तहसीलदार यांनी आजपासून (3 एप्रिल) बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, अंबाजोगाई महसूल विभागातील एक तहसीलदार आणि तीन नायब तहसीलदारही संपावर गेले आहेत, त्यामुळे तहसील कार्यालयातील कामांना ‘ब्रेक’ लागला आहे.

राजपत्रित वर्ग – 2 नायब तहसीलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड – पे मुद्यावरुन हा संप पुकारण्यात आला आहे. नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते. त्यामुळे ग्रेड पे 4300 रुपयांवरुन 4800 रुपये वाढवण्याची त्यांची मागणी आहे.

दरम्यान, राज्य सरकारने 13 ऑक्टोबर 1998 रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरुन वाढवून वर्ग दोन केला होता. मात्र वेतनवाढ केली नव्हती. मागील 25 वर्षांपासून राज्यातील नायब तहसीलदार वर्ग दोन या पदावर काम करतात, मात्र वर्ग तीनचे वेतन घेत आहेत. त्यामुळे नायब तहसीलदारांनाही इतर विभागांतील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे.