बॉलिवूडच्या ‘सिंघम’ चा आज वाढदिवस : ‘या’ कारणामुळे अजय देवगणने बदलले खरे नाव

टीम AM : बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आज आपला 55 वा वाढदिवस साजरा करतोय. अभिनेता अजय देवगणने ‘गोलमाल’ पासून ‘सिंघम’ पर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 

अजय देवगणने सांगितले होते की, तो गर्दीत हरवू नये, म्हणून त्याने नाव बदलले होते. आजही त्याचे काही जुने मित्र त्याच नावाने हाक मारतात. याशिवाय अजयने त्याच्या आईच्या आडनावाचे स्पेलिंग सुद्धा बदलले आहे.

काय आहे अजयचे खरे नाव ? अजय देवगणचे खरे नाव आहे विशाल. अजय देवगणने 2009 मध्ये एका मॅगझीनच्या मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, जेव्हा तो बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार होता तेव्हा तीन दिग्गजांचे पदार्पण आधीच निश्चित झाले होते. सलमान, शाहरुख आणि आमिर त्याकाळात पदार्पण करत सिनेमे सुपरहिट करत होते. त्यामुळे इतरांची स्पर्धा करण्याच्या तुलनेत अजयला नाव बदलण्याची गरज वाटली. म्हणून विशाल नाव बदलून त्याने अजय नाव स्वीकारले.

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ ने गेल्या वर्षी 2022 ला बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली होती. त्यामुळे आता त्याच्या ‘भोला’ या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना खुप अपेक्षा होत्या. रामनवमीच्या मुहूर्तावर ‘भोला’ या ॲक्शन – थ्रिलर  थिएटरमध्ये रिलिज झाला. ‘भोला’ बनलेल्या अजय देवगणच्या अभिनयापासून ते दिग्दर्शनापर्यंत त्याचे खूप कौतुक होत आहे. 

समीक्षकांनी या चित्रपटाचे भरपूर कौतुक केले आहे, तर सोशल मीडियावर लोकांनी ‘भोला’ ला फुल पैसा वसूल चित्रपट म्हटले आहे. ‘भोला’ ने पहिल्याच दिवशी 11.50 कोटींचे कलेक्शन केले आहे. तरी बजेटच्या तुलनेत हे चांगले कलेक्शन  नाही.

‘भोला’ ने पहिल्याच दिवशी सरासरी कमाई केली आहे. असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. याशिवाय दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी भोलाची कमाई जेमतेम आहे. त्यामुळे अजयचा 3D असलेला ‘भोला’ समीक्षकांना आवडला असला तरीही प्रेक्षकांनी मात्र पाठ फिरवलेली दिसतेय.

सोलर एनर्जीच्या कंपनीचे काम, हॉटेल व्यवसाय, चित्रपटांचे वितरण असे अनेक अजय देवगणचे व्यवसाय आहेत. अजयने 1999 मध्ये काजोल सोबत लव्ह मॅरेज केले. त्याला न्यासा आणि युग ही दोन मुले आहेत. भारत सरकारने अजय देवगणला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.