‘स्वरविहार’ च्या सूर – संगीताने हर्षित झाली संघर्षभूमी !

अंबाजोगाई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त संघर्ष भूमीवर ‘स्वरविहार’ संगीत रजनी मोठ्या उत्साहात पार पडली. प्रा. राजकुमार ठोके प्रस्तूत व स्वरमंडल संगीत विद्यालय निर्मित ‘स्वरविहार’ हा तथागतांच्या व बोधिसत्वांच्या जीवन कार्याचे संगीतमय दर्शन घडविणारा कार्यक्रम मोठ्या आनंदमय वातावरणात झाला. ‘स्वरविहार’ च्या सूर – संगीताने संघर्षभूमी खऱ्या अर्थाने हर्षित झाली.

या कार्यक्रमाची सुरुवात महामानवांना पुष्प अभिवादन करून सामुहीक वंदनेने झाली. नंतर प्रा. राजकुमार ठोके यांचा निळी टोपी, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. राजकुमार ठोके व प्रा. राहुल सुरवसे यांच्या सुरेल व मधूर गायनाने सर्व वातावरण भाराऊन गेले. 

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. राजकुमार ठोके यांच्या ‘तुलाच घे मुजरा गौतमा तुलाच घे मुजरा’ या वंदन गीताने झाली. त्यानंतर त्यांनी ‘अतिथी हा जयभीम घ्यावा, भीम तुमचा आमचा दुवा’ हे जोशपूर्ण गीत सादर केले. तसेच ‘भाजीत भीम आहे रोटीत भीम आहे’ व ‘ही माझ्या आईची पैठणी’ ही गीते सादर केली. उपस्थितांनी वेळोवेळी टाळ्यांचा गजर करून त्यांच्या गीतांना दाद दिली. कार्यक्रमात प्रा. राहुल सुरवसे यांनी ‘भीमाच्या पुण्याईने राहतो मी खुशीत’, भारताचा घटनाकार झाला माझा भीमराव !’ व ‘माझ्या साहेबाला हे आयुष्य उदंड लाभावे गं’ ही गीते अत्यंत सुरेलपणे सादर केली. या गीतांनाही उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली.

कार्यक्रम समारोपाला असलेले वेळेचे बंधन यामुळे गायकांनी कमी वेळात पण दर्जेदार गीते सादर करून सर्वांची मने जिंकली. हा कार्यक्रम विनामुल्य सादर व्हावा, यासाठी ॲड. सुरेखा राजकुमार ठोके यांनी विशेष साह्य केले.              

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किर्तीराज लोणारे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. गणेश सुर्यवंशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन ॲड. संदीप थोरात यांनी केले. या कार्यक्रमास विविध नगरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. शाम तांगडे, गुलाबराव गायकवाड, खंडेराव जाधव, द्रुपदाआई सरवदे, बबनराव ठोके, पंकज भटकर, अनंत सरवदे, धम्मपाल लोणारे, अर्जुन वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.