टीम AM : समृद्धी महामार्गावर ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात हा अपघात झाला असून यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणींसह आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास घडला आहे. डॉक्टर ज्योती क्षीरसागर (राहणार, मालेगाव, जिल्हा – वाशीम ), डॉक्टर फाल्गुनी सुरवाडे (राहणार – अमरावती ) आणि भरत क्षीरसागर (राहणार, मालेगाव, जिल्हा – वाशीम ) अशी मृतकांची नाव आहेेत. घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचत वाहतूक सुरळीत केली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, समृद्धी महामार्गावर नागपूरच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या कारने मागून जबर धडक दिली. या भीषण अपघातात मालेगाव येथून नागपूरला जात असलेल्या कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणींसह एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ज्योती क्षीरसागर आणि फाल्गुनी सुरवाडे या दोन्ही डेंटिस्ट डॉक्टर असून चांगल्या मैत्रिणी होत्या. नागपूरला कामानिमित्त रात्री समृद्धी महामार्गाने जात असताना ज्योती क्षीरसागर यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार ही समोरील ट्रकला मागून धडकली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, जाम महामार्ग पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करण्यात आली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत सेलू पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तीनही मृतदेह सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.