आईच्या अंत्यदर्शनाला आलेल्या मुलीने पार्थिवावरच सोडले प्राण : मनाला चटका लावणारी घटना

टीम AM : आईचे निधन झाल्यानंतर अंत्यदर्शनासाठी माहेरी आलेल्या मुलीने पार्थिवाजवळच प्राण सोडल्याने मनाला चटका लावणारी घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील गयाबाई शेवाळकर यांचे निधन झाले. त्यांची मुलगी जयमाला जाधव हीला आईच्या निधनाची बातमी समजताच ती तिच्या माहेरी निघून आली. आईचे पार्थिव पाहताच जयमाला यांनी हंबरडा फोडत रडायला सुरूवात केली. आई गेल्याचे दु:ख त्यांना सहन न झाल्याने त्यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांना नांदेडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच जयमाला यांनी प्राण सोडले होते.

गयाबाई किशनराव शेवाळकर यांचे शुक्रवारी दिनांक 31 मार्चला वृद्धापकाळाने हदगाव तालुक्यातील तामसा येथे निधन झाले होते. जयमाला जाधव (56) आईच्या निधनानंतर त्यांच्या माहेरी आल्या होत्या. पण त्यांनी पार्थिवावर प्राण सोडल्याने शेवाळकर आणि जाधव कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक म्हणजे जयमाला जाधव यांच्या पतीचे आठ महिन्यांपूर्वीच निधन झाले होते आणि सासू सासऱ्यांचेही निधन झाल्यामुळे त्या एकटेपणाने खचल्या होत्या. त्यात आता आईचाही मृत्यू त्यांना सहन झाला नाही. हदगांव तालुक्यातील या घटनेने तामसा गावावर शोककळा पसरली.