टीम AM : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आज दि. 30 मार्च रोजी रामनवमी निमित्त धार्मिक कार्यक्रम सुरु असताना मोठी दुर्घटना घडली. शहरातील पटेल नगरमध्ये बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात विहिरीचे छत कोसळल्याने 30 हून अधिक भाविक पाण्यात पडले.
या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 17 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सपना संगीता रोडवरील स्नेह नगर येथे मंदिरात होम सुरू असताना हा अपघात झाला. कन्यापूजनाचा कार्यक्रम असल्याने मंदिरात भाविकांची गर्दी होती. विहिरीच्या छतावर 30 हून अधिक लोक बसले होते. अतिरिक्त वजनामुळे विहिरीचे छत तुटले. 30 हून अधिक भाविक 40 फूट खाली पडले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बेलेश्वर महादेव मंदिरात घडलेल्या दुर्घटनेची दखल घेतली. त्यांनी इंदूरचे जिल्हाधिकारी आणि इंदूरच्या आयुक्तांना बचाव कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. विहिरीत कोसळलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु करण्यात आले.
आतापर्यंत 17 जणांना विहिरीच्या पायऱ्यांवरून वाचवण्यात यश आले आहे. सुमारे 12 रुग्णवाहिका बचाव कार्यात गुंतल्या आहेत. विहिरीत चार ते पाच फूट पाणी असल्याने बचावकार्यात अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. घटनास्थळी सातत्याने बचावकार्य सुरू आहे. आतमध्ये किती लोक अडकले असतील हे आत्ताच सांगता येणार नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे.